InterviewSolution
| 1. |
औषधी वनस्पतीचे उद्देश |
|
Answer» वैद्यकशास्त्राचा ‘औषधिविद्या’ नावाचा एक मुख्य भाग आहे. त्यात औषधीचे वर्णन व औषधी योजना असे दोन पोटविभाग आहेत. औषधी वर्णनात झाडे ओळखणे, त्यांची उत्पत्ती व कोणता भाग वापरावयाचा ह्याचा समावेश आहे. औषधींचे रंग, आकार, विशिष्ट गुण इ. समजावून घेणे महत्त्वाचे आहे. औषधी योजनेत शरीराचे निरनिराळे भाग आणि त्यांवर विशिष्ट औषधींचा होणारा परिणाम व त्यायोगे त्या कोणत्या रोगात कशा प्रकारे वापरावयाच्या हे महत्त्वाचे आहे. वनौषधी ओळखण्याची सुलभ पद्धत म्हणजे तिला दिलेले शास्त्रीय द्विनाम. वनस्पतीस द्विनाम द्यावयाची पद्धत यूरोपमध्ये अठराव्या शतकात कार्ल लिनीअस यांनी सुरू केली परंतु भारतात त्याही पूर्वी तज्ञांनी औषधी वनस्पतीच्या वर्गीकरणाची एक पद्धत सुरू केली होती. उदा., बलाचे किंवा रानमेथीचे वेगवेगळे प्रकार वेगळ्या नामावलींनी दर्शविले आहेत : बला (सिडा ॲक्यूटा ), अतिबला (सिडा ऱ्हाँबिफोलिया ), भूमिबला (सिडा व्हेरोनिसिफोलिया ), नागबला (सिडा स्पायनोजा ) (कंसात लॅटिन द्विनामे तुलनेसाठी दिली आहेत). बहुधा एकाच कुलातील वनस्पती ओळखण्यासाठी ही पद्धत वापरली जात असावी. प्राचीन काळी औषधी वनस्पतिज्ञानाच्या प्रबोधनासाठी होमहवनाबरोबर चर्चासत्रेही आयोजित केली जात असत. त्यांमध्ये गार्गी, मैत्रेयी यांसारख्या विदुषीही भाग घेत असत. बुद्धकाळामध्ये परोपकार, दया यांबरोबरच रूग्णांच्या शुश्रूषेलाही महत्त्व होते. बुद्ध-अशोक काळात भारतीय औषधी ज्ञानभांडार उच्च प्रतीचे मानले गेले होते. पुढे यावनी आक्रमणानंतर ह्या सर्व संशोधनात खंड पडून अर्धवट ज्ञानी किंवा बैरागी, वैदू वा आदिवासी यांनी औषधी वनस्पतींची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या अर्धवट ज्ञानाने चुकीच्या काष्ठौषधी पुरवल्या जाऊन औषधांचा गुण येईनासा झाला. चांगल्या, उत्तम ज्ञानी वैद्यांनी वनौषधींचे ज्ञान पुढील पिढीस दिले नाही किंवा तसे शिष्यगणही निर्माण केले नाहीत. पुढे ब्रिटिश कारकीर्दीत मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधनास सुरूवात झाली. भारतीय वनस्पतींवर व समृद्ध निसर्गावर ब्रिटिश, यूरोपीय शास्त्रज्ञांनी अनेक पुस्तके लिहिली. डब्ल्यू. डॉयमॉक, जी. वॉट आदि परकीयांबरोबरच व्ही. सी. दत्त, ⇨कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, बी. डी. बसू, आर्. एन्. चोप्रा, के. एम्. नाडकर्णी वगैरे भारतीयांनीही वनौषधींच्या ज्ञानात भर घातली. |
|