InterviewSolution
| 1. |
श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. |
|
Answer» मराठी दिनदर्शिके प्रमाणे श्रावण हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. बालकवींच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे "श्रावण मासी हर्ष मानसी" असा हा महिना. आनंदाने भरलेला असा हा महिना यास निसर्ग ही समरसतेने साथ देतो असे म्हटले तर उचित होईल. आषाढातील मेघमल्हार च्या अनवट रागदारी नंतर हळुवार, अलवार तसेच नाजूक ताना व लकेरी म्हणजे श्रावण मास असे वर्णन नक्कीच समर्पक वाटेल. श्रावणात निसर्ग आपल्या अनंत हातांनी सौंदर्याची मुक्तपणे उधळण करीत असतो. निसर्ग ऊन पावसाच्या खेळामुळे अवघ्या धरणीला आनंदाचे तसेच सुशोभितपणाचे वरदान देतो. अवघा निसर्ग टवटवीतपणात न्हाऊन निघालेला असतो. कृष्णवर्णीय मेघांनी गिरीमाथा झाकून गेलेला असतो व त्याचमुळे डोंगरमाथ्याने मंदिल धारण केल्याचा भास होतो. पावसाची एखादी हलकीशी सर येऊन गेली की हेच शिरोभूषण कापसाचा पुंजका ठेवल्याप्रमाणे धवल रंगात उजळून येते. काही ठिकाणी रस्त्यांनी चालतांना धुक्यामुळे ढगातून चालल्याचा प्रत्यय येतो. नुकताच आषाढ संपलेला असल्यामुळे धरणी मनसोक्त पाणी प्राशन करून हरित व टवटवीत झालेली असते. हिरवेकंच रेशीम वापरून विणलेल्या गालीच्यावर विविध रंगी फुले पाने मनसोक्त बागडत आहेत हे नयनमनोहर दृश्य फक्त श्रावणातच पहावयास मिळते. |
|